
काँग्रेस आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे निधन झाले ते 63 वर्षाचे होते. मुंबईत एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रावसाहेब अंतापूरकर नांदेड जिल्ह्यातील बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले. 2009 साली त्यांनी पहिली निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले होते. अत्यंत मनमिळावू तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची या मतदारसंघात ओळख होती.
राजकीय मंडळींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. विकास कामाच्या संदर्भात आणि विविध समस्या सोडविण्यासंदर्भात ते नेहमीच आग्रही राहायचे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र दहा ते पंधरा दिवसापूर्वी त्यांना अन्य काही आजारामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उपचार सुरु होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.































































