मुंबईतील भुयारं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

मुंबईसारख्या महानगरीत सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखालून भुयारी मार्ग बनविले जात आहेत. समुद्राच्या किनारी वसलेल्या मुंबईत जमिनीखाली भुयारी मार्ग व्यवहार्य आहेत का असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित झाला. मात्र मुंबईत शहराचा इतिहास वेगळंच सांगतो. येथे अनेक ब्रिटिशकालीन भुयारे अलीकडील काळात उगड झाली आहेत. ही मुंबईतील वाळूभऱया मातीतली सगळी भुयारं जर इतकी वर्षं टिकली आहेत तर आता खणलेली मेट्रोसाठीची भुयारंही टिकू शकतीलच की!

सध्या मेट्रोसाठी म्हणून जणू अख्खी मुंबई खणून काढताहेत असं दिसतंय. पण मुंबईतील भुयारांबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मी मात्र निश्चिंत झाले. मुंबईचं भविष्य मातीतल्या वाळूवर नाही तर बोगदे बांधणाऱया अभियंत्यांवर अवलंबून होतं.

सुमारे 200 वर्षांपूर्वीचं एक भुयार जनरल पोस्ट ऑफिसच्या खाली सापडलं तेव्हा सुरुवातीला पोस्ट मास्तर जनरल फैझ उर रेहमान यांचा तर त्यावर विश्वास बसेना. 25 वर्षे आपण ज्या इमारतीत काम करतोय तरी त्याबद्दल कधी ऐकलं नाही, तसं कधी जाणवलं नाही, मग हे कसं शक्य आहे, असं रेहमान यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्यावर लगेच काही प्रतिक्रिया द्यायचं नाकारलं.

ही गोष्ट ऑक्टोबर 2010ची! त्या इमारतीच्या समोरच्या बागेत एक सिमेंटने बनवलेली जागा होती, जिथे एक मोठं झाकण होतं आणि त्यावर एक कुंडी ठेवलेली होती. ते झाकण काढण्यासाठी तीन माणसं लागली. आत एक गंजकी शिडी होती ती चिखलाने भरलेल्या जमिनीवर पोहोचत होती. आणखी दुसरी दोन झाकणं काही मीटर अंतरावर होती, जी खाली जात होती. त्या भुयारांतून कोणताही घाणेरडा वास येत नव्हता. त्यामुळे ती सांडपाण्यासाठीची नव्हती, हे स्पष्ट होतं. शिवाय ती आतमध्ये एवढी मोठी होती की कोणीही माणूस आत चालत जाऊ शकला असता.

ब्रिटिशांनी अपोलो बंदर ते मुंबई हायकोर्ट व सेंट जॉर्जेस हॉस्पिटल इथे भुयारं यासाठी बनवली असावी की अलेक्झांडरने हल्ला केलाच तर सुरक्षित ठिकाणी पळून जाता यावं. मुंबईत अनेक ठिकाणी अशी भुयारं सापडली. एप्रिल 2019 मध्ये गव्हर्नरच्या मोठय़ा बंगल्याखाली एक बंकर सापडला. तो दरबार हॉल खाली चालू होतो आणि समुद्रापर्यंत जातो.

आत लांब पॅसेज आणि 13 रिकाम्या खोल्या सापडल्या. या भुयाराच्या दगडी भिंतींमध्ये हवा खेळण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत. अर्थात गेल्या अनेक वर्षांत त्यातून पाणी आणि चिखल आत आले आहेत. 1875मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीची तयारी म्हणून हे भुयार बनवले असावे असा अंदाज आहे. तिथे लावलेल्या पाटय़ांवरून असं दिसतं की, तिथे छोटी हत्यारे, बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या इत्यादी ठेवलं जात असे. शिवाय तिथल्या दोन लहान जिन्यांवरून असं वाटतंय की, खाली आणखी काही गुपितं दडलेली असावीत.

जीपीओच्या शेजारी सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये आणखी एक भुयार सापडलं. तळमजल्यावरील एका वॉर्डमध्ये ते उघडतं. 200 वर्षांपूर्वीचं, 1.5 कि.मी. लांब असलेलं हे भुयार एका बाजूने बंद असल्याचं आढळलं.
हे भुयार जीपीओतील भुयारापेक्षा जास्त जुनं असावं असा होरा आहे. तीनच्या रांगेत असलेले डझनभर खांब हे सांगत आहेत की, ही सुटकेची वाट म्हणून बांधत असावेत.
या सगळ्या शोध काळात जास्त घाबरले कोण असतील तर ते रिझर्व्ह बॅंकेचे लोक. जेव्हा 2010मध्ये सापडलेलं भुयार गेट वे ऑफ इंडिया, ब्लू गेट आणि चर्चगेट इथे निघतं तेव्हा रिझर्व्ह बॅंकेला अशी भीती वाटली की, ही भुयारं मुंबईवर हल्ला करण्यासाठी वापरली तर काय?
हे तर हॅरी पॉटरच्या गोष्टीतील ग्रिगॉटस बॅंकेसारखं वाटतंय. विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनच्या हेरिटेज गॅलरीच्या खाली एक तळघर सापडलंय, जे 18व्या शतकात बनवलेलं आहे आणि याला काही एखादं सहज न दिसणारं दार आहे असं नाही; तर अनेक किलो वजनाचं, किल्लीसाठीच्या दोन लपवलेल्या छिंद्रांचे मोठं लोखंडी दार आहे. हे उघडलं की एका वळणावळणाच्या जिन्याने खाली जाता येतं आणि तिथल्या दरवाजालादेखील एक कुलूप आहे. आता तिथला व्हॉल्ट रिकामा असला तरी पूर्वी त्यात पैसे ठेवत व मग ते बॅंकेत टाकले जात.
तेथे चांगली हवा खेळते व प्रकाशही असतो. 1967मध्ये इलेक्ट्रीसिटी येईपर्यंत इथली 4 बाय 4 ची लिफ्ट दोन माणसं ओढत असत.
ही मुंबईतील वाळूभऱया मातीतली सगळी भुयारं जर इतकी वर्षं टिकली आहेत तर आता खणलेली मेट्रोसाठीची भुयारंही टिकू शकतीलच की!

[email protected]