जेव्हा हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटात दिसला होता बिग बींचा ‘जलसा’, वाचा काय आहे हा किस्सा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाला जितकं वलय आहे, तितकंच वलय त्यांच्या घरांनाही आहे. त्यांच्या घराची एक झलक पाहायला मिळावी म्हणून बऱ्याचदा त्यांचे चाहते त्यांच्या घरांभोवती घोटाळताना दिसतात.

प्रतीक्षा, जनक आणि जलसा अशा बिग बींच्या तिन्ही घरांच्या परिसरात त्यांच्या चाहत्यांची वर्दळ बऱ्याचदा पाहायला मिळते. त्यातल्या जलसा या बंगल्याशी निगडीत एक किस्सा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

खुद्द बिग बींनीच या बंगल्याच्या निर्मितीमागची कहाणी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जलसा आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या एका गाजलेल्या चित्रपटाचा जवळचा संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हा चित्रपट म्हणजे क्लासिक कॉमेडी या विभागात गणला गेलेला ‘चुपके चुपके’ होय. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया बच्चन, शर्मिला टागोर, ओमप्रकाश अशा कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे. परिमल त्रिपाठी नावाच्या एका प्राध्यापकाच्या प्रेमकहाणीत घडणाऱ्या गमतीजमतींवर हा चित्रपट बेतलेला आहे.

या चित्रपटात परिमल यांच्या मित्राची, प्राध्यापक सुकुमार सिन्हा यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. आपला मित्र (असरानी) याच्या मेहुणीच्या प्रेमात पडलेल्या सुकुमार यांची धमाल त्रेधातिरपिट अमिताभ यांनी अजरामर केली आहे. याच चित्रपटातील एक प्रसंग बिग बींनी शेअर केला आहे.

त्यात जया आणि अमिताभ यांच्यातील एक प्रसंग असून त्या प्रसंगात पार्श्वभूमीवर एक बंगला दिसत आहे. हा बंगला वास्तविक प्रसिद्ध निर्माते एन. सी. सिप्पी यांचा होता. बिग बी यांनी तो त्यांच्याकडून खरेदी केला. पण काही कारणास्तव त्यांनी तो विकला आणि काही वर्षांनी पुन्हा विकत घेतला. त्यानंतर त्यांनी या बंगल्याला पाडून त्या जागी नवीन बंगला बांधला. तोच आजचा प्रसिद्ध असा जलसा बंगला.

मूळच्या सिप्पी यांच्या बंगल्यात अनेक चित्रपट चित्रीत झाले आहेत. त्यात नमक हराम, आनंद, सत्ते पे सत्ता, चुपके चुपके अशा काही गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे, अशी माहिती बिग बींनी या पोस्टद्वारे दिली आहे.