गाववालों! लग्न लावून द्या, नाहीतर… प्रियकराने दिली ’शोले’ स्टाईलने धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शोले’ सिनेमात विरू ज्याप्रमाणे बसंतीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतो, अगदी त्याचप्रमाणे बिहारच्या सुपौलमध्ये एका तरुणाची नौटंकी नुकतीच गाववाल्यांनी बघितली. प्रेयसीसोबत लग्न लावून द्या, नाहीतर उडी मारेन, अशी धमकी देत तो 12 तास पाणीच्या टाकीवर होता.

प्रशांत कुमार असे तरुणाचे नाव आहे. त्याचे मधुबनी जिह्यातील तरुणीवर प्रेम आहे. तरुणीच्या वडिलांचा या लग्नाला विरोध आहे. त्यांचे मन वळवण्यासाठी प्रशांत कुमारने हा वेगळा मार्ग निवडला. शुक्रवारी रात्री 8 वाजता तो पाण्याच्या टाकीवर चढला. त्याने आत्महत्येची धमकी दिली. कधी प्रेयसीला समोर आणण्याची तर कधी तिच्या वडिलांना समोर आणण्याची मागणी केली. रात्रभर त्याचे नाटक सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले.

त्याला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमा झाली. फायर ब्रिगेडच्या जवानांनाही बोलावण्यात आले. पण तो काही खाली उतरला नाही. जोपर्यंत तरुणीला बोलावून लग्न लावून दिले जात नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. सुमारे 12 तासांनंतर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने मोठय़ा प्रयत्नाने त्याला टाकीवरून खाली उतरवले.