अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर भटकंती भोवणार; पोलिसांकडून कारवाईचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन मोहिम होती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरात बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत विशेष सवलती व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिले आहेत.

महापालिकेने अटी व शर्ती, अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा तसेच वस्तू बाबतच्या सवलती व इतर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्ंयांवर कलम 188 नुसार तसेच साथरोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे. शासनाच्या लॉकडाउन संदर्भातील नवीन आदेशानुसार शहरात प्रशासन व पोलीस यांनी चर्चा करुन नवीन आदेश काढले आहेत.

संबंधित आदेशचे पालन करण्यासाठी पोलीस पूर्णपण दक्ष राहणार आहेत. त्यासाठी महत्वाच्या चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय पेट्रोलिंग आणि जनजागृतीला प्राधान्य देण्यात आले आहे. सवलती दिलेल्या सेवा व व्यक्ती यांना कोणताही त्रास पोलिसांकडून होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. परंतु, नागरिकांनी योग्य कारणाशिवाय बाहेर पडू नये. नागरिकांनी पोलिसांनी ओळखपत्र व कागदपत्रे दाखविण्यास सांगितल्यास त्यांना सहकार्य करावे. नागरिकांवर अयोग्य कारवाई होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी या नियमांचे पालन करावे

  • जवळच्या किराणा दुकानात पायी जाऊन मालाची खरेदी करावी.
  • भाजीपाला व किराणा मालासाठी वाहनांचा वापर करु नये.
  • नाकाबंदीत वाहन आढळून आल्यास चौकशी होऊ शकते.
  • एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकांना किराणा व भाजीपाला आणण्यासाठी जवळच्या तरुणांनी मदत करावी