ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने 25 कोरोना रुग्णांना नवजीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘फक्त दोन-तीन तास पुरेल इतकाच ऑक्सीजन आता शिल्लक आहे. तुमच्या रुग्णांना तातडीने दुसऱया रुग्णालयात हलवा.’ असे रुग्णालयाकडून सांगताच नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. इतर रुग्णालयांमध्ये चाचपणी सुरू झाली. पण कुठेच बेड मिळत नव्हता. फक्त वेळ जवळ येत चालली होती. आता करायचे काय? शेवटचा अर्धा तास उरला. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. संतापही होता. पण पर्यायच सापडत नव्हता. आणि अचानक ऑक्सिजनचे दहा जम्बो सिलिंडर घेऊन गाडी रुग्णालयाच्या गेटवर पोहोचली. देव पावला होता. कोण होता तो देवाचा अवतार? ते होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे.

मीरा-भाईंदरच्या स्वस्तिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयातील ही मंगळवारी उशीरा रात्रीची घटना. 25 रुग्ण तिथे कोरोनावर उपचार घेत आहेत. कुणी ऑक्सीजनवर आहे तर कुणी व्हेंटीलेटरवर. मंगळवारी रात्री रुग्णालयातील ऑक्सीजन संपत आला होता. काही तासच पुरेल इतका शिल्लक होता. रुग्णालय प्रशासन ऑक्सीजन पुरवठादारांना सतत फोन करत होते. परंतु काही कारणास्तव ऑक्सिजन मिळत नव्हता. नाईलाजास्तव रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनाला रुग्णांच्या नातेवाईकांना सांगावे लागले. नातेवाईकांनी मग इतर रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था होतेय का यासाठी प्रयत्न सुरू केले. पण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड कुठेच रिकामी नव्हते.

रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या परिचयाचे डॉ. ऋषिकेश मुंडे यांना फोन करून परिस्थितीची जाणीव करून दिली. डॉ. मुंडे यांनी ऑक्सिजनसाठी खूप प्रयत्न केले. मार्ग सापडत नव्हता. अखेर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना संपर्क साधून माहिती दिली. खारगे यांनी तातडीने मीरा-भाईंदर आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करून ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

खारगे यांच्या फोननंतर प्रशासन कामाला लागले. अवघ्या अर्ध्या तासात ऑक्सीजनचे सिलिंडर घेऊन गाडी स्वस्तिक रुग्णालयात पोहोचली. रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांना हायसे वाटले. ऑक्सीजन आता कमी पडणार नाही याची खात्री झाली. 25 रुग्णांचे प्राण वाचले. अन्यथा जीवावर बेतले होते. सर्वांनी ऑक्सिजनची व्यवस्था कोणी केली याची माहिती घेतली. खारगे यांचे नाव समजताच प्रत्येकाने हात जोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खारगे यांचे तिथूनच आभार मानले.