लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्क्यातील फरारी आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोरमधील लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्क्यातील फरारी सराईत दरोडोखोराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. बसचा सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपीला पकडण्यात आले. चंद्रकांत लोखंडे (वय 32, रा. ढवळ ता. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

नवी मुंबईत दरोडा, जबरी चोरी, घरपोडी, चोरी यासारखे 14 गंभीर गुन्हे दाखल असलेला चंद्रकांत लोखंडे याने दहशत पसरवली होती. त्याने कापूरहोळ गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्सवर साथीदारांसोबत दरोडा टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला नीरा येथून ताब्यात घेत राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर भोर लॉकअपमध्ये असताना त्याने 17 फेब्रुवारीला लॉकअपचा गज कापून पहाटेच्या सुमारास पलायन केले होते. पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. आरोपी चंद्रकांत लोखंडे मुंबईहून कर्नाटकला जाण्यासाठी ट्रॅव्हल्समधून निघाला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

पथकाने पुणे- मुंबई महामार्गावर बसचा पाठलाग सुरू केला. चांदणी चौकातून बस खेड शिवापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी सिनेस्टईल पाठलाग करून खेडशिवापूरला बस अडविली. बसमध्ये आरोपी चंद्रकांत लोखंडे आढळून आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला भोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, शिंदे, मोमीन, शेडगे, भगत, खडके, नवले, घाडगे, जगताप, पठाण, निश्चित, तांबे, राजापुरे, कदम, जावळे, नाईकनवरे यांच्या पथकाने केली.