रुग्णांना चाचणी अहवाल लवकर द्या, रुग्णशय्या मिळण्यातही अडचण नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येता कामा नयेत. यासाठी मुंबईत अतिरिक्त बेडची व्यवस्था करा. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल कमीत कमी वेळेत उपलब्ध करता येईल अशी व्यवस्था निर्माण करा. रुग्णांना प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाईन बैठकीत घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. बाधित रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त रुग्णशय्या उपलब्ध करा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठय़ासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

अवाजवी बिलांसाठी लेखापरीक्षक

खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्या अवाजवी बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी 35 रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. देयक तयार होताच त्याचे स्वतःहून लेखापरीक्षण करण्यात येत असल्याचे चहल यांनी सांगितले.

रेमडेसिवीरसाठी प्रयत्न सुरू

रेमडेसीवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही, याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या 2 लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यातील 25 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे चहल यांनी सांगितले.

24 तासांच्या आत चाचण्यांचे रिपोर्ट

कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी येत्या काळात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

ऑक्सिजन पुरवठय़ाच्या समन्वयासाठी 6 अधिकारी

मागील आठवडय़ात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये 350 रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी महानगरपालिकेकडून 6 समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमण्यात आले आहेत. तर मुंबईतील प्रत्येकी 4 विभागांमागे एक याप्रमाणे एकूण 24 प्रशासकीय विभागांसाठी 6 प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करून देऊ शकतील. मुंबईतील 64 नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात आली आहे.

मुंबईतील बेडची संख्या 22 हजारांवर जाणार – इक्बालसिंह चहल

मुंबईत एकूण 153 कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या 20 हजार 400 रुग्णशय्या आहेत. आठवडाभरात ही संख्या 22 हजार होईल. 10 फेब्रुवारी 2021 पासून आजमितीपर्यंत 1050 आयसीयू रुग्णशय्या नव्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता 8 ते 10 हजारादरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणार्या रुग्णांची संख्या देखील 10 हजाराच्या घरात आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज 3 हजार 900 रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत. मोठया खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठयाची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्स संलग्न करून देण्यात येत आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱयांची प्रामुख्याने अँटीजेन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचे विलगीकरण करून, आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरून बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ही सूचना तातडीने अंमलात आणण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.