
माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात, राज्यपालांकडे तक्रार करतात. या देशात मोदी नावाचा कायदा आला आहे का? आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपालांना देण्यात आला आहे काय, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज केला. मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपने केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवरून व राज्यपालांकडे केलेल्या मागणीवरून नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जळगाव जिह्यातील भाजपच्या माजी आमदारावर रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. हे आरोप करताना मलिक यांनी काही पुरावे दिले. कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर मिळत नसताना भाजपचे अंमळनेरचे माजी आमदार आणि हिरा ग्रुपचे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. हा साठा केवळ निर्यातीसाठी असताना 8 एप्रिलला चौधरी बंधूंनी रेमडेसिवीरचे वाटप केले. जवळपास 700 ते 800 इंजेक्शन वाटण्यात आली, मात्र आमच्या माहितीनुसार 20 हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक्स फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी 700 ते 800 इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिह्यात काळाबाजार करून वाटण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
माझ्याकडे बोट दाखवत असताना क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भंडाफोड आज ना उद्या करणार आहे. भतिजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे.
पश्चिम उपनगरातील भाजपचे एक आमदार आहेत
ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याकडून काय काय घेतले, किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱया काळात सांगू, असा इशाराही मलिक यांनी दिला.
भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
निर्यातीसाठी असलेला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा अंमळनेर, नंदुरबारमध्ये वाटप केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच ब्रूक फार्मा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.
रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत असताना आणि राज्य सरकारलाही या इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नसताना 8 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजी शिरीष चौधरी यांनी अंमळनेर, नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खासगीरीत्या कशी वाटली, असा सवाल सावंत यांनी केला.
भाजपा नेत्यांचे आणि ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी आणि इंजेक्शनचोर भाजप नेत्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले.


























































