मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे संकट टळले, रात्री उशिरा फोन अन् तातडीने ऑक्सिजनचे दोन टँकर मिळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा अत्यल्प होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवेदनशीलतेमुळे कोरोना रुग्णांना प्राणवायू मिळाला. रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी फोन केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले आणि नगर जिह्यासाठी ऑक्सिजनचे दोन टँकर रात्रीच मिळाले. दरम्यान, ‘कोरोना संकटात राजकारण करू नका, एकत्रपणे संकटाचा मुकाबला करू’ अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच मांडली आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगर जिह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिह्यात अनेक ठिकाणी ‘रेमडेसिविर’सह ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जिह्यात काल केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होता. नगर जिह्यात रोज 60 ते 70 टन ऑक्सिजन सध्या लागत आहे. मात्र, काल रात्री अवघा 10 ते 15 टन साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनवरील रुग्णांना दुसऱया रुग्णालयांत हलविण्याची धावपळ सुरू होती. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱयांकडे याबाबत तक्रारही केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी संबंधित रुग्णालयांशी थेट संपर्क करून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार काल रात्री जिल्हा रुग्णालयातून काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविला होता. जिह्यातील काही उद्योजकांनीही त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांसाठी दिले होते.

मंगळवारी रात्री नेमके काय घडले?

– नगर जिह्यासाठी 60 टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. यापैकी 15 टन जिल्हा ग्रामीण रुग्णालयांसाठी, 45 टन खासगी रुग्णालयांसाठी असून, यात हा ऑक्सिजनपुरवठा उपलब्ध करून देताना काही नियम-अटी लागू करण्यात आल्या आहेत. तशा सूचना वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनपुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध झाले आहेत; परंतु हे टँकर शिक्रापूर, रांजणगाव येथे अडविले होते. मात्र, लोकप्रतिनिधी, प्रशासनाने राज्य शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन ते ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

खासदार डॉ. विखेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

– ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नगर जिह्यासाठी पुण्यातून ऑक्सिजनचे दोन टँकर उपलब्ध करून दिले. ‘पोलीस बंदोबस्तात हे टँकर जिह्यात दाखल झाल्यानंतर रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयांचे काम रात्रीत सुरळीत झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो,’ असे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाला ऑक्सिजन, रेमडेसिविर मिळाले पाहिजे – बाळासाहेब थोरात

n ‘नगर जिह्यासाठी मंगळवारची रात्र भयानक होती. ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत सगळीकडून फोन येत होते. पुण्याहून नगरकडे निघालेला टँकर थांबविण्यात आला होता. याबाबत मी मुख्य सचिवांशी बोललो. नगरकडे निघालेला टँकर थांबविणे चुकीचे असल्याचे सांगितल्यानंतर टँकर रवाना करण्यात आले,’ असे सांगतानाच, राज्यात सर्व जिह्यांत ऑक्सिजन, रेमडेसिविरचे समान वाटप व्हायला पाहिजे. प्रत्येकाला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर मिळाले पाहिजे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, अशी आपली भूमिका असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.