
संपुर्ण देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावण्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. केंद्रातील भाजप सरकार जनतेला जगण्याचा मुलभूत हक्क देण्यास तसेच मृतांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यास पुर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजप सरकारला एक मिनीट ही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी घणाघाती टिका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
दिल्ली हायकोर्टाने काल रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल केंद्र सरकारला फटकारताना भाजप सरकारचे भांडवशाही धोरण उघडे पाडले. “लोकांचे प्राण जात असताना सरकारला उद्योगांचे जास्त पडलेले आहे असे सांगत लोकांच्या जगण्याचे सरकारला काहीच पडलेले नाही” असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद करुन केंद्र सरकारला फटकारले आहे.
आज लोकांची प्राणवायुसाठी धडपड चालु असताना, केंद्रातील भाजप सरकार केवळ भाषणबाजी करण्यात व्यस्त आहे. केंद्र सरकारची कोविड हाताळणीतील असमर्थता आता स्पष्ट झाल्याने, राष्ट्रपतींनी दखल घेवुन त्वरित राष्ट्रीय कृतीदल समितीची स्थापना करावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांकडे कोविड हाताळणीसाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी केल्यानंतर, 23 मार्च 2020 रोजी मी पंतप्रधानांकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याची मागणी केली होती. दुर्देवाने भाजप सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ” टाळी बजाव, थाली बजाव, दिया जलाव” उत्सव साजरे करण्यावर भर दिला.
मागील आठ महिन्यांत कोविडची दुसरी लाट येणार याची माहिती असुनही सरकारने स्वताची जाहिरातबाजी करण्यात वेळ वाया घालविला. आज दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातलगांना कित्येक तास ताटकळत रहावे लागत आहे. या सरकारकडे नैतीकता व संवेदनशीलता शिल्लकच राहीलेली नाही.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधायक सुचनांकडे भाजप सरकारने जाणीवपुर्वक कानाडोळा केला. चार दिवसांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी योग्य उपाय योजना सुचविण्यासाठी माजी पंतप्राधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्र लिहील्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी त्यांच्यावर नाहक टिका केली व त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नाकर्तेपणामुळे आज देशवासीयांना कोविड मृत्युच्या जबड्यात ढकलले आहे असे दिगंबर कामत म्हणाले.































































