
मागील लॉकडाऊनच्या काळात ई पासच्या माध्यामातून नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासाची मुभा देण्यात आली होती. गुरुवारी राज्यात ‘ब्रेक दी चेन अंतर्गत’ कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर आता अत्यावश्यक कारणासाठी जिल्हांतर्गत प्रवासात ई-पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना हा ईपास उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध 1 मेपर्यंत लागू राहणार आहेत. याअंतर्गत अत्यावश्यक कामासाठी नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने ‘ई-पास’ सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई-पासचा वापर करावा असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
ई– पाससंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे
- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱयांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
- ज्यांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी लागणार आहे.
ई– पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं?
- ई-पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ज्यानंतर इथं ‘applyed for pas here’ या पर्यायावर क्लिक करावं.
- पुढे तुम्हाला ज्या जिह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
- आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत.
- प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
- पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
- या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
- प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

































































