
‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’, ‘माझ्या नवऱयाने सोडलीया दारू’, ‘पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’, ‘आता तरी देवा मला पावशील का’ आदी एकापेक्षा एक सरस गाणी लिहिणारे प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांचे आज सानपाडा येथील घरी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.
हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांनी पहिले गाणे लिहिले होते, मात्र हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्षे वाट पाहावी लागली होती.
हरेंद्र जाधव यांनी 10 हजारांहून अधिक गाणी लिहिली आहेत. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, अनुराधा पौडवाल यांच्यापासून ते बेला सुलाखे, साधना सरगमपर्यंत अनेक गायक-गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.

























































