
जालना शहरात आयपीएल बुकीवर छापा टाकून 1 लाख 18 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. यातील दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. या छाप्यामुळे जालन्यातील बुकींचे धाबे दणाणले आहे.
जालना शहरातील काहीजण आयपीएलमध्ये खेळण्यात येणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावर लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून मॅचवर बेटिंग, सट्टा जुगार चालवित आहेत, अशी माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी रविवारी माहिती मिळाली की, सकलेचानगर, जालना येथे दोनजण सोमवारी खेळल्या जाणाऱ्या सनराईस हैद्राबाद विरुध्द दिल्ली कॅपीटल या क्रिकेट मॅचवर लोकांकडून पैसे घेवून त्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून जुगार खेळ खेळत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सकलेचानगर येथे छापा मारला असता रोहित अरुण तोडकर (रा. कुंभारगल्ली, जालना) घटनास्थळी आढळले. त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमध्ये वेगवेगळ्या नंबरवरुन व्हॉटस्अॅपव्दारे व मेसेजव्दारे क्रिकेट मॅच बद्दलचे आकडे दिसून आले. ते मोबाईलव्दारे आयपीएल क्रिकेट मॅचवर जास्त दराने लोकांना आमिष दाखवून क्रिकेट मॅचवर जुगार खेळवत आहे. त्यांच्याकडून नगद, स्मार्ट फोन, मोटार सायकल असा एकुण 1 लाख 18 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही व्यक्ती बुकी चेतन मोतीलाल जावळे (रा.बावसरगल्ली) व अन्य एका जणाच्या सांगण्यावरुन मोबाईलवरुन सॅनराईस हैद्राबाद वि. दिल्ली कॅपीटल यांच्यादरम्यान सुरु असलेल्या मॅचवर बेटिंग, सट्टा जुगार खेळवत होते.
त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, दुर्गेश राजपुत, हरीष राठोड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, मदनसिंग बहुरे, महिला अंमलदार पुनम भट्ट यांनी केली आहे.































































