
ज्येष्ठ दाम्पत्य आणि त्यांच्या कुकला चाकूच्या धाकाने बाथरूमध्ये कोंडून 15 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना औंधमधील उच्चभ्रू वर्दळीच्या सिंध सोसायटीत रविवारी रात्री घडली. बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर दाम्पत्याने मुलास फोन करून कळविल्यानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंध येथील सिंध सोसयाटीतील बंगला क्रमांक 817 मध्ये तक्रारदार महिला पतीसोबत राहतात. त्यांच्याकडे एकजण केअर टेकर व कुक म्हणून काम करतो. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुकला तीन जण किचनच्या बाजून येत असल्याचे दिसले. कुकने त्यांना हटकल्यानंतर तिघेही घरात घुसले. त्यांनी कुकच्या पोटाला चाकू लावून अंगाची झडती घेत पैशाची विचारणा केली. त्यानंतर चोरटे कुकला घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरूमध्ये गेले. त्यानंतर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला पैसा-पैसा म्हणत त्यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर त्यांची पर्स हिसकावून पैसे घेतले.
दुसऱ्या व्यक्तीने महिलेच्या पतीच्या गळ्याला चाकू लावून ‘पैसे किधर रखे है’ अशी विचारणा केली. पतीला मारहाण सरू केली. त्यावेळी महिलेने मारहाण करू नका असे म्हणत त्यांना बेडरूनचे कपाट उघडून दिले. चोरट्यांनी कपाटातील ऐवज काढून घेतला. दाम्पत्यासह कुकला बाथरूमध्ये बंद केले. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले रोख 70 हजार रूपये, सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, डॉलर असा 15 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून पळ काढला.
बाथरूममध्ये कोंडलेले तिघेही पंधरा ते वीस मिनिटे आतमध्ये होते. चोरटे गेल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून बाहेर आले. त्यानंतर महिलेने त्यांच्या मुलास फोन करून कळविले. त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी बंगल्यात धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव हे अधिक तपास करत आहेत.
भिंतीवरील घड्याळ दिले हातात
चोरट्यांनी दाम्पत्यासह कुकला बाथरूममध्ये कोंडण्याआधी घरातील भिंतीवर लावलेले घड्याळ काढून हातात दिले. त्यांना बाथरूमध्ये कोंडत 10 मिनिटे बाहेर यायचे नाही, असा दम चोरट्यांनी दिला. पोलिसांना खबर केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी दाम्पत्याचे मोबाईलवर फोटो देखील काढून घेतला.



























































