
>> दिलीप देशपांडे
अलौकिक प्रतिभेचे देणे लाभलेल्या चिं. त्र्यं. खानोलकरांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांचे आशयघन काव्यसंग्रह त्यांच्या शब्दावरचे प्रभुत्व दाखवतात. त्यांच्या कथा–कवितांमधील प्रतिमा वाचकाला भुरळ पाडतात. खानोलकरांचे असे समग्र साहित्य, दुर्मिळ छायाचित्र घेऊन स्मारक उभे राहिल्यास मराठी साहित्य क्षेत्रात भूषणावह गोष्ट ठरेल
चिंतामणी त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभू हे नाव मराठी साहित्यात आणि मराठी वाचकाला अनोळखी नाही. प्रतिभासंपन्न कवी, कादंबरीकार, कथाकार, आणि नाटककार म्हणून लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. खानोलकरांचा जन्म 8 मार्च 1930 आणि मृत्यू 26 एप्रिल 1976. उणेपुरे सेहेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. संघर्षमय जीवन वाटय़ाला आले. अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या चिं. त्र्यं. खानोलकरांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागलं. तरीही आपल्या अल्पायुष्यात अजगर, गणूराया आणि चानी, त्रिशंकू, कोंडुरा, पाषाणपालवी, पिशाच्च या कादंबऱया; जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे असे आशयघन काव्यसंग्रह त्यांच्या शब्दावरचे प्रभुत्व दाखवतात. राखी पाखरू, सनई हे कथासंग्रह. अजब न्याय वर्तुळाचा, अवध्य, एक शून्य बाजीराव, कालाय तस्मै नमः, रखेली, श्रीमंत पतीची राणी, सगेसोयरे, हयवदन, अभोगी इ. नाटके… ज्यांचं नाटय़सृष्टीत वेगळंच स्थान होतं. चानी, कोंडुरावर चित्रपट निघालेत. खूप मोठय़ा साहित्याची निर्मिती त्यांच्याकडून झाली. प्रतिभेचं खूप मोठं देणं त्यांना लाभलं होतं हे मान्यच करावं लागेल. अस्सल कोकणी बाजाच्या कथा हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. माणसाचं अस्तित्व, माणूस आणि निसर्ग, माणसातले विकार, वृत्ती यावर त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या कथा-कवितांमधील प्रतिमा वाचकाला भुरळ पाडतात.‘नक्षत्रांचे देणे’ काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अनेक नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेत.
खानोलकरांच्या साहित्य निर्मितीमागील पार्श्वभूमी अद्भुत आणि काहीशी अनाकलनीय होती. पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात- ‘असे वाटते की, खानोलकरवर काही लिहू नये. त्याच्या पुस्तकातून जो खानोलकर आता हाती उरला आहे त्यालाच घेऊन एकटे बसावे. त्या पुस्तकांतून त्यालाच बोलू द्यावे. त्याचेच ऐकत राहावे.’ त्याच्या त्या लोकविलक्षण अनुभवांची खोली गाठण्याची आपली ऐपत आहे का नाही ते अजमावत राहावे. श्वास कोंडायला लागला तर स्वतःच्याच मनाशी पराजय मान्य करावा. चूप बसावे. हा एक नवलाचा पक्षी या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले -कळलेसे वाटणारे बोलला काय आणि कळण्या-न कळण्याच्या सीमेवरचे काही तरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरटय़ातून आला होता तिथे निघूनही गेला काय… त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत.
श्री. ना. पेंडसे म्हणतात, ‘काव्य’ ही खानोलकरांची सत्तेची दौलत. कथा, कादंबरी, नाटक हे नाही म्हटलं तरी अंकित प्रदेश. पण हे तिन्ही प्रकार त्यांनी अशा उंचीवर नेले की दौलतीचा प्रदेश संपतो कुठे तेच कळेनासं होतं. खानोलकरांच्या लेखनाचा वेग लक्षात घेता ते इतकं संपन्न लेखन करतात कसं याचं आश्चर्य वाटे. मी त्यांच्या लेखनापैकी मुक्त दाद दिली ती ‘अजगर’ आणि ‘चानी’ यांना. कोणत्याही भाषेला भूषण वाटाव्यात अशा या कथा आहेत. तर प्रभाकर पाध्ये म्हणतात -त्यांना दक्षिण कोकणातील जीवनाचे जे खोल दर्शन झाले होते, त्याच्या आदिम अंतःप्रकृतीचा जो साक्षात्कार त्यांना झाला होता त्याची प्राकृतिक रंगरूपे त्यांनी सादर केली. तेथील जीवनाचा ठाव त्यांच्या प्रतिभेने घेतला. तेथील लोकांच्या रक्ताळलेल्या वासना, जन्म, मृत्यू, निसर्ग, नियती यांच्या नानाविध विपरीत दर्शनांनी त्यांची भणाणलेली मने यांचे रंग-रूप-नाद-गंधात्मक चित्रण त्यांनी केले. त्यांच्या आदिम प्रकृतींनी प्रेरित झालेल्या जीवनाच्या प्रतिमा त्यांनी रेखाटल्या. त्यांच्या असामान्य यशाचे रहस्य यात आहे.
खानोलकरांविषयक आठवणी सांगताना मधु मंगेश कर्णिक सांगतात- रत्नागिरीत पंचवीस वर्षांपूर्वी ओळख झालेला चिंतामणी त्र्यंबक खानोलकर त्यानंतरच्या काळात माझा एक निकटचा मित्र बनला. कुडाळला त्याची खानावळ होती. दोन वेळ जेवायला चमचमीत मिळत होते. नि मनातली कवितेची वेल दिसामासानी वाढत होती, फुलत होती, बहरत होती….त्याच काळातली आमची मैत्री. आजही आठवणी आल्या की मनाला अतृप्तीची हुरहुर लागते. ट्रंकेतळीच्या जुन्या पैठणीला यावा तसा आठवणींचा हुरहुर लावणारा सुवास मनात दाटून येतो.
एकोणसाठ साली खानोलकर कुडाळ सोडून मुंबईत आले. मुंबईला कायम घर करण्यासाठी. कुडाळ सोडताना मनाने उद्ध्वस्त झाले होते. मुंबईला आल्यावर आकाशवाणीत नोकरी धरली. तिथेही त्यांच्याविषयी झालेल्या गैरसमजाने नोकरी सोडावी लागली. नंतर विद्यापीठात कारकुनाची नोकरी धरली. तिथेही मन लागले नाही. सतरा वर्षे खानोलकर मुंबईत राहिले, पण तिथे कधीही रमले नाहीत.
त्यांची आठवण सांगताना जया दडकर सांगतात-खानोलकरांचा जीव गुंतला होता कोकणच्या निसर्गात. शहरी संस्कृतीचा मुखवटा त्यांनी कधी स्वतःच्या चेहऱयावर चढवला नाही. ते अखेरपर्यंत कोकणीच राहिले. कोकणच्या मातीतले सारे गुणदोष त्यांच्या स्वभावात प्रकर्षाने एकवटले होते. त्यामुळे शहरातले सुसंस्कृत छक्केपंजे जाणून घ्यायचा त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही.
हृदयनाथ मंगेशकरांना ‘ये रे घना ये रे घना’…गाणे ध्वनिमुद्रित करायचे होते..त्यांनी खानोलकरांना पुढील दोन कडवी लिहून देण्याविषयी विचारले. शून्यात दृष्टी नेऊन खानोलकरांनी नकारात्मक मान हलवली. बरहुकूम कविता लिहिता येत नाही मला असाच अर्थ होता… मग मंगेशकर शांताबाई शेळकेंकडे गेले. शांताबाईंनी त्यांना समजावले. मला लिहिता येणार नाही म्हणून त्यांनाही नकार दिला. शेवटी शांताबाईंनी दोन कडवी लिहून दिलीत. कडवी छान लिहिली म्हणून खानोलकरांनी त्यांचे कौतुक केले. गाणं मिळालं म्हणून मंगेशकर जाऊ लागले. तेवढय़ात खानोलकरांनी त्यांना थांबविले. थोडा विचार केला आणि एका कागदावर अचानक आठ ओळी लिहून दिल्यात…
‘टाकुनिया घरदार,नाचणार नाचणार…’
मग शांताबाईंची कडवी रद्द केली. खानोलकरांची कडवी ठेवण्यात आली. शांताबाईंनी त्यांच्या कडव्यांचं मनापासून कौतुक केलं. मंगेशकर म्हणतात, तुझ्यातला तो कलाकार, तो उमदेपणा, ती मैत्री मी आणि शांताबाई कधी विसरू शकणार नाही.हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांची अनेक गीते संगीतबद्ध केलीत..ती खूप गाजलीत. त्या दोघांमध्ये एक वेगळेच शब्द-सुरांचं नातं होतं.
चिं. त्र्यं. खानोलकरांचे प्रकाशित-अप्रकाशित असे समग्र साहित्य एकत्रित जमवून, वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी, एक स्मारक सिंधुदुर्ग जिह्यात वेंगुर्ला तालुक्यात वायंगणी गावाजवळ उभारण्याची कल्पना मध्यंतरी काही वर्षांपूर्वी पुढे आली होती. अतिशय चांगली कल्पना होती. पण पुढे त्याविषयी काय झाले समजले नाही व स्मारकाच्या कामाबद्दल वाचायला मिळाले नाही. खानोलकरांचे असे समग्र साहित्य, दुर्मिळ छायाचित्र घेऊन स्मारक उभे राहिल्यास मराठी साहित्य क्षेत्रात भूषणावह गोष्ट ठरेल यात शंका नाही!





























































