
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. या कामांबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पालिका अधिकाऱयांसोबत ऑनलाइन बैठक घेऊन आढावा घेतला. कोरोना खबरदारी घेऊन ही कामे वेळेत पूर्ण करा, असे निर्देश यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.
पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा आढावाही आदित्य ठाकरे यांनी घेतला. कोस्टल रोडची टीम तसेच पालिकेच्या सी, डी आणि जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांना यावेळी आवश्यक निर्देश देण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून मान्सनपूर्व कामे करण्यात येत असून पाण्याचा निचरा वेळेत होण्यासाठी पातमुखे, खुला नाला व पंपिंगच्या माध्यमातून कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
तसेच पालिकेचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू राहणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कामाच्या प्रगतीसाठी कामगार व इतर साधनसामग्रीचे नियोजन करावे आणि ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिकेला दिले.
वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला ‘बोर्ड वॉक’चाही आढावा
वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला यादरम्यान पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया बोर्ड वॉक प्रकल्पाचा आढावाही पर्यटनमंत्री यांनी पालिका अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीत घेतला. हा प्रकल्प 4.77 किमी लांबीचा राहणार असून सायकल ट्रक आणि पादचारी मार्ग राहणार असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
विविध धार्मिक स्थळांना जोडणारा हा प्रकल्प मुंबईकर-पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.





























































