
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव देशातील विविध राज्यांमध्ये वाढल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगावर प्रचंड टीका होत आहे. तसेच मद्रास न्यायालयानेही ताशेरे ओढलेले आहेत. यानंतर अखेर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे निकाल घोषित झाल्यानंतर मिरवणुका काढता येणार नाही, असे आयोगाने जाहीर केले आहे. सर्व प्रकारच्या मिरवणुकांवर पूर्णपणे बंदी असणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने होत असल्याने अखेर शेवटच्या टप्प्यात निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारासह केवळ दोन लोकांनी उपस्थित राहून निकालाचे प्रमाणपत्र घेऊन जायचे असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
पश्चिम बंगाल, तामिळनाडु, आसाम, केरळ आणि पाँडेचेरीच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित करण्यात येणार आहेत. चार राज्यांमध्ये निवडणुका संपल्या आहेत तर बंगाल मध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. यादरम्यान आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट गंभीर बनत चालले आहे. अशात निवडणुकांच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय सभांवरून प्रश्न उपस्थित होत होते. देशभरातून झालेल्या टीकेनंतर बंगालमध्ये सातव्या टप्प्यात रोड शो, सभा, चौकसभा या सर्व रोखण्यात आल्या. राजकीय पक्षांना व्हर्च्युअल सभा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले, दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार




























































