बँकांच्या एमडी, सीईओंची कारकीर्द आता 15 वर्षेच; आरबीआयचा मोठा निर्णय, ‘कोटक महिंद्रा’ला पहिला झटका बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी बँकांच्या एमडी, सीईओ या प्रमुख पदांच्या नियुक्तीला नवी कालमर्यादा घातली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती 15 वर्षांपेक्षा अधिक काळ बँकेच्या एमडी किंवा सीईओ पदावर राहू शकणार नाही. या निर्णयाचा सर्वात पहिला झटका ‘कोटक महिंद्रा’ बँकेला बसणार आहे. बँकेच्या संस्थापक-सीईओपदी उदय कोटक हे 17 वर्षांपासून आहेत. त्यामुळे ते फेरनियुक्तीसाठी अपात्र ठरणार आहेत.

आरबीआयने सोमवारी रात्री नवीन नियम जारी करताना विविध पदांसाठी कालमर्यादा ठरवली आहे. नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, कोटक महिंद्रा बँकेला याचा अधिक फटका बसेल. बँकेच्या प्रमुख पदांवर असलेल्या उदय कोटक आणि दिपक गुप्ता या दोघांनाही 2023 नंतर पदांपासून दूर व्हावे लागेल. दोघांनी बँकेच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे हे दोघे बाजूला झाल्यानंतर बँकेच्या भावी वाटचालीवर परिणाम होईल, असे ‘नोमुरा’ या वित्तीय संस्थेने म्हटले आहे. आरबीएल व इतर बँकांनाही काही प्रमाणात फटका बसेल.

काय आहेत नवे नियम?

  • कोणतीही व्यक्ती 15 वर्षांपेक्षा अधिक काळ खासगी बँकेच्या एमडी किंवा सीईओ पदावर राहू शकणार नाही. बँकेतील शेअरहोल्डर किंवा प्रमोटर 12 वर्षे या पदावर राहील. आरबीआय संबंधित नियुक्तीला 3 वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. मात्र वयोमर्यादा 70 वर्षांचीच असेल.
  • कोणतीही व्यक्ती 75 वर्षे वयानंतर नॉन-एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत राहू शकणार नाही. यात बँकेच्या चेअरमनचाही समावेश आहे. मात्र हा नियम सरकारी आणि विदेशी बँकांना लागू नसेल.