सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील टाकीच्या सफाईदरम्यान तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील टाकीची साफसफाई व पाईपलाईन ब्लॉकेज काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा मिथेन वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना कारखान्याच्या मागील बाजूस पर्यावरण विभागात घडली. दरम्यान, कारखाना प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने टाकी फोडून मृतदेह बाहेर काढले.

संदीप रमेश कांबळे (वय 38, रा. कुटवाड), राजेश यशवंत ठोमके (40, रा. उदगाव), गोपाळ सिद्राम जंगम (43, रा. औरवाड) अशी मृतांची नावे आहेत.

सध्या गाळप हंगाम बंद असल्याने कारखान्याने पर्यावरण विभागाकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या टाक्या स्वच्छ करण्याबरोबर देखभालीचे काम सुरू केले आहे. प्रकल्पाच्या मुख्य टाकीतून जादा होणारे केमिकलयुक्त आणि मळीमिश्रित हिरवट रंगाचे पाणी हे एका टाकीतून मुख्य पंपाकडे पाठवले जाते. अनेक दिवस या टाकीचा वापर करण्यात आलेला नव्हता. तसेच, टाकीच्या तळातून पंप हाऊसला जाणारे पाईप ब्लॉक झाले होते. त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी कामगार टाकीत उतरले होते.

पहिल्यांदा एक कामगार शिडीच्या साहाय्याने खाली उतरला. थोडय़ाच वेळात त्याचा श्वास गुदमरून तो जागीच कोसळला. तत्काळ दुसरा कामगार त्याला वाचवण्यासाठी शिडीवरून उतरत असताना त्याचा तोल जाऊन तोही खाली पडला. दोघांना वाचवण्यासाठी तिसरा कर्मचारी टाकीत उतरला. मात्र, मिथेन वायूमुळे या तिघांचाही केवळ सात मिनिटांत गुदमरून मृत्यू झाला. आपले तीनही सहकारी निपचित पडले असल्याचे चौथा कामगार हुसेन मुजावर याच्या लक्षात आले. त्याने तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही आपण गुदमरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो बाहेर आला अन् बेशुद्ध पडला.

आरडाओरडा झाल्यानंतर इतर कामगार घटनास्थळी आले. टाकीत पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, यश आले नाही. शेवटी सिमेंटची टाकी व त्यावरील जाड लोखंडी झाकण जेसीबीच्या साहाय्याने फोडून काढले. अर्जुनवाडचे कामगार प्रमोद मेडशिंगे व राजू रजपूत या दोघांनी तिघा कर्मचाऱयांना खांद्यावरून बाहेर आणले. तत्काळ कामगारांना दत्त आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिघांचाही तत्पुर्वीच मृत्यू झाला होता.