
ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचे बोलले जात असताना मुंबईत तब्बल दोन हजारांवर नव्वदीपार वय असलेल्या रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. वर्षभरात 90 वर्षांपेक्षा वय जास्त असलेल्या 2277 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील 200 जणांचा मृत्यू झाला, मात्र 2077 जणांनी कोरोनाला हरवले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली. यामध्ये ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना कोरोनाची लागण लवकर होत असल्याचे निरीक्षण आरोग्यतज्ञांनी मांडले. रुग्णांच्या जाहीर होणाऱया आकडेवारीवरून ही बाब अधोरेखितही झाली होती. मात्र नव्वदीपार हजारो रुग्णांनी कोरोनाला हरवल्याचे समाधानकारक चित्र पालिकेने डॅशबोर्डवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. नव्वदीपार लागण झालेल्या 2277 रुग्णांमध्ये 53 टक्के पुरुष, तर 47 टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.
समुपदेशन, आपुलकी, घरच्यांशी संपर्क
- वृद्ध आणि सहव्याधी असताना कोरोना झाल्याचे कळताच अनेकांना मानसिक धक्का बसल्याचे प्रकार समोर येत होते. वृद्धांना क्वारंटाइनमध्ये येणारा एकटेपणा, घ्यावी लागणारी काळजी हे प्रश्नदेखील समोर होते.
- मात्र पालिकेच्या कोरोना केअर सेंटर, जम्बो कोविड सेंटरमध्ये नव्वदीपार रुग्णांशी डॉक्टर नियमितपणे संपर्क साधून आपुलकीने विचारपूस करतात. शिवाय टॅबच्या माध्यमातून नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क करून देतात.
- यामुळे औषधोपचारासोबत वयस्कर रुग्णांना मानसिक आधारही मिळतो. त्यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत झाल्याचे पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झाल्यानंतर डिस्चार्ज देताना आपुलकीने निरोप देण्यात येतो.
घरोघरी तपासणी ठरली फायदेशीर
कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना ज्येष्ठांचा बचाव करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण, तपासणी आणि आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात आली. ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असणाऱयांना आणि सहव्याधी असणाऱयांवर सहायक उपचार तातडीने करण्यात आले. तर या सर्वेक्षणात लक्षणे आढळणाऱया पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तातडीने बेड उपलब्ध करून औषधोपचार करण्यात आले. ही मोहीम सर्वात जास्त उपयुक्त ठरल्याचे डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
देव पावला…
कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी जरी दुसऱया लाटेत लोकांच्या मनात भीती नसली तरी कोरोनासारख्या आजारात मानसिक कसोटी तर लागतेच आहे. मग मनोमन देवाच्या आणाभाका घेतल्या जातात. त्यात समाजमाध्यमातून येणाऱया बातम्या आणि टीव्हीतून दाखवली जाणारी दृश्ये धडकीच भरविणारी असतात. अशा नकारात्मक वातावरणातही शंभरी गाठलेल्या दाम्पत्याने केली कोरोनावर मात, अवघ्या काही दिवसांच्या बाळाने दिली कोरोनाला टक्कर अशा चांगल्या बातम्या मनाला हुरूप देत आहेत. याच मालिकेत बोरिवलीचे सूर्यकांत परब तसेच मालाडच्या कुसुम खटावकर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आणि त्यांना पुन्हा आपल्या घराकडे जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याने त्यांना देव पावल्यासारखेच वाटले…





























































