निर्बंध किती वाढणार? 30 एप्रिलला होणार घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांची मुदत 1 मे रोजी सकाळी सात वाजता संपत आहे. यानंतरही हे कठोर निर्बंध लागू राहणार का याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर निर्बंधांचा कालावधी किमान 15 दिवसांनी वाढवण्याबाबत  चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने 30 एप्रिल रोजी त्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत निर्बंधांचा कालावधी 1 मेनंतरही वाढविण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी निर्बंध कालावधी वाढविण्याची मागणी केली.

या कारणांसाठी निर्बंध वाढणार

  • मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्हय़ांत रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही.
  • रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर प्राणवायूचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
  • रुग्णालयात खाटांची कमतरता आहे.
  • अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. म्हणून निर्बंध वाढविण्यावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निर्बंधाचा कालावधी वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की 15 दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण कालावधीत नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान 15 दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे.