
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात त्याने 55 चेंडूत 57 धावा केल्या. त्यात तीन चौकार व दोन षटकारांचा समावेश आहे. ही खेळी त्याच्या संघाला विजय जरी मिळवून देऊ शकली नसली तरी त्याच्या वैयक्तिक पातळीवर त्याला चांगलीच फायदेशीर ठरली आहे.
या खेळीमुळे वॉर्नरने तीन नवे रेकॉर्ड केले आहेत. वॉर्नरच्या टी-20 फॉरमॅटमध्ये दहा हजार धावा पूर्ण झाल्या असून हा रेकॉर्ड करणारा जगातील तो चौथा खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये 50 अर्धशकत करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याखालोखाल हिंदुस्थानचा शिखर धवन 43 अर्धशतकं करून दुसऱ्या तर विराट कोहली 40 अर्धशतकं करून तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीतही वॉर्नर सामिल झाला आहे.
काय आहे विराट व रोहीतचा टी-20 मधला स्कोअर
टी-20 मध्ये आतापर्यंत डेव्हिड वॉर्नरच्या आधी क्रिस गेल, किरेन पोलार्ड, शोएब मलिक या तिघांनीच दहा हजार धावा केलेल्या आहेत. क्रिस गेल (13839), पोलार्ड (10694), शोएब मलिक (10488) धावा केल्या आहेत. तर हिंदुस्थानकडून विराट कोहलीने आतापर्यंत 9894 धावा तर रोहीत शर्माने 9266 धावा केल्या आहेत.



























































