मोफत लसीकरणासाठी काँग्रेसच्यावतीने दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटकाळात राजकीय पक्षांसोबत सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात मोफत लसीकरणासाठी आपले एक वर्षाचे मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय काँग्रेसचे मंत्री व आमदारही एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या माध्यमातून दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होतील.

देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वेत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे आवाहन केले. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना अनेक लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या, पण केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने कोरोना संकटकाळात आपल्या जबाबदारीपासून पळ काढत लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, धंदे, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी राज्यांना मदत करणे तर दूरच राहिले केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसेही देत नाही. अशा विपरित परिस्थितीतही काँग्रेस पक्षाच्या मागणीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढय़ाला बळ देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असे थोरात यांनी सांगितले.

कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येईल. त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापनांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी.
– बाळासाहेब थोरात महसूल मंत्री