
यंदाच्या आयपीएल मोसमात पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच लढतींमध्ये पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापनाने शनिवारी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकत केन विल्यमसनकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत उद्या सनरायझर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. महत्त्वाच्या लढतीआधी कर्णधार बदलण्यात आल्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ उद्या कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सनरायझर्स हैदराबादला या मोसमात अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच त्याच्या संथ फलंदाजीवरही चोहोबाजूंनी टीका करण्यात येत आहे. प्रशिक्षक स्टाफ व डेव्हिड वॉर्नर यांच्यामध्येही संघ निवडीवरून मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या सर्व कारणांमुळेच डेव्हिड वॉर्नरला तडकाफडकी कर्णधारपदावरून काढण्यात आले.
संघातील स्थानही जाणार
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून परिपत्रक काढून नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली. या परिपत्रकात पुढे म्हटले की, राजस्थान रॉयल्सविरुद्ध उद्या होणाऱया लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघातील परदेशी खेळाडूंच्या कॉम्बिनेशनमध्येही बदल करण्यात येणार आहे. या वक्तव्यावरून डेव्हिड वॉर्नरला उद्याच्या लढतीत अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला डेव्हिड वॉर्नरऐवजी संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
आजच्या आयपीएल लढती
राजस्थान रॉयल्स – सनरायझर्स हैदराबाद
नवी दिल्ली, दुपारी 3.30 वाजता
पंजाब किंग्स – दिल्ली कॅपिटल्स
अहमदाबाद, रात्री 7.30 वाजता
































































