
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हिंदुस्थानने तातडीने काही आठवडय़ांचा पूर्ण लॉकडाऊन लागू करावा, असा सल्ला अमेरिकेतील महामारी तज्ञ डॉ. ऍन्थॉनी फाऊची यांनी दिला आहे. हिंदुस्थानातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सहा महिन्यांच्या शटडाऊनची गरज नाही, परंतु यासाठी तात्पुरता शटडाऊन करायला हवा, असे त्यांनी सुचवले आहे. ते बायडेन प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय सल्लागार असून अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केले आहे.
डॉ. फाऊची यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या वेळी त्यांनी हिंदुस्थानने कोरोना लढय़ात कोणती पावले उचलली पाहिजेत, यावर भाष्य केले. देश बंद करणे कुणालाही आवडणारे नाही. परंतु कोरोना लढय़ात हा प्रभावी उपाय आहे. ऑक्सिजन, औषधे आणि पीपीई किटची उपलब्धता वाढवणे हीदेखील दुसरी गरज आहे. त्याचबरोबर लसीकरणाची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. असे डॉ. फाऊची यांनी नमूद केले.
वैद्यकीय सुविधांची बोंब; लोकांची रस्त्यावर वणवण
हिंदुस्थान अत्यंत भीषण, वाईट परिस्थितीतून जातोय. लोक त्यांच्या आई-वडिलांना, भावाबहिणींना घेऊन ऑक्सिजन मिळवण्यासाठी रस्त्यावर वणवण फिरताहेत. लसीकरण गरजेचेच आहे. मात्र निव्वळ लसीकरण केले म्हणून वैद्यकीय सुविधांअभावी होणारे हे हाल लगेच थांबणारे नाहीत. आताच्या घडीला लोकांची काळजी घ्या. हिंदुस्थानात केवळ दोन टक्के लोकांना लस टोचलीय ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे डॉ. फाऊची म्हणाले.
‘थ्री स्टेप फॉर्म्युला’
या घडीला लोकांना लस टोचणे अत्यंत जरुरीचे आहे. याशिवाय ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधांच्या तुटवडय़ाचा प्रश्न सोडवला पाहिजे. यासाठी एक आयोग किंवा इमर्जन्सी ग्रुप तयार केला पाहिजे. ऑक्सिजन कसा मिळेल, पुरवठा कसा होईल, औषधे कशी मिळतील, याचा प्लान बनवला पाहिजे. यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर देशांशी चर्चा करा.
युद्धपातळीवर रुग्णालये उभारा. याबाबतीत चीनप्रमाणे काम करा. चीनने काही आठवडय़ांत तात्पुरती रुग्णालये उभारली होती. देशात फिल्ड हॉस्पिटलचे मॉडेल राबवा. यासाठी हिंदुस्थानी लष्कराची मदत घ्या.
दीर्घकालीन उपाय म्हणून जास्तीत जास्त लोकांना वेळीच लस द्या, लसीकरणावर भर द्या. लसींची उत्पादन क्षमता वाढवा. हिंदुस्थानने तत्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपाय राबवण्याची गरज आहे. आधी तत्काळ उपाय करा. त्यानंतर मध्यम स्वरुपाचे उपाय लागू करा आणि शेवटी दीर्घकालीन उपायांचा विचार करा.




























































