
सध्या हिंदुस्थानात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे येथील सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम दिसून येत आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपवरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कोरोनाचा संसर्ग ओसरला नाही तर हिंदुस्थानातील टी-20 वर्ल्ड कप यूएईत हलवण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी दिली; पण या स्पर्धेचे हक्क हिंदुस्थानकडेच असतील असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.
आयसीसी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले की, सध्या तरी हिंदुस्थानातच टी-20 वर्ल्ड कप आयोजन पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आम्ही स्पर्धा इतरत्र हलवण्याबाबत निर्णय घेऊ. दरम्यान, यूएई हा टी-20 वर्ल्ड कपसाठी पर्याय असेल याचे संकेत मिळाले होते.
आयपीएल यशस्वी पार पडली
कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचे आयोजन हिंदुस्थानात करण्यात आले नव्हते. अखेर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत यूएईत ही स्पर्धा खेळवण्यात आली. यूएईत आयोजित करण्यात आलेली स्पर्धा यशस्वी पारही पडली. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजनही तेथे करता येऊ शकते.
आम्ही तेथे आयोजन करू – धीरज मल्होत्रा
हिंदुस्थानातील कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आम्ही यूएई हा पर्याय डोळ्यांसमोर ठेवला आहे; पण या स्पर्धेचे आयोजन तेथे होत असले तरी ते बीसीसीआयच्या वतीने करण्यात येईल, असे धीरज मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले.
नऊऐवजी पाच स्थळांवर होईल स्पर्धा
बीसीसीआयकडे स्पर्धा आयोजनासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. सध्या बीसीसीआयकडून नऊ शहरांमध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीकडे ठेवण्यात आलेला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊऐवजी पाच शहरांतील स्टेडियममध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येऊ शकतील.




























































