हडपसर पोलिसांनी सुतावरून गाठले खूनी संतोषला, दीड वर्षांपुर्वी झालेल्या खूनाची केली उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील हडपसर पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे सुमारे दीड वर्षांपुर्वी झालेल्या खूनाचा उकल झाली आहे. एका तपासादरम्यान आरोपीने फक्त संतोष नावाचा उल्लेख केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून जेष्ठाचा खून करणाऱ्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. त्यामुळे सुतावरून स्वर्ग नव्हे तर संतोषला अटक केल्यामुळे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. संतोष सहदेव शिंदे (वय 27, रा. फुरसुंगी, मूळ- चाकूर, लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय 65, रा. फुरसुंगी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पतीसोबत बोलल्याचा राग आल्यामुळे भेकराईनगरमध्ये पतीने पत्नीवर चावूâने वार करून खून केल्याची घटना 7 एप्रिलला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सागर बाळू लोखंडे (वय 23) याला अटक केली. चौकशीदरम्यान सागरने पोलिसांना सांगितले की, एक वर्षापुर्वी त्याने शुभांगी लोखंडे सोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतरही ती पहिल्या नवीऱ्यासोबत बोलत होती. त्यामुळे भांडणात तिने एकदा, सागरला माझ्या नवऱ्याने एक वर्षापुर्वी मर्डर केला आहे. तु जर आमच्या मध्ये आलास तर तो तुलाही संपवून टाकेल, अशी धमकी दिली होती. त्यानुसार पोलिसांना आरोपी सागरकडून संतोष नावाची माहिती मिळाली.

दीड वर्षापुर्वी फुरसुंगीतील जेष्ठाच्या खूनाची उकल झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याहेतूने तपास सुरू केला. हा खून संतोषनेच केल्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी त्याला चिखलीतून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जेष्ठाच्या खुनाची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, सैदोबा भोजराव, संदीप राठोड, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, राहुल मद्देल यांच्या पथकाने केली.

म्हणून केला होता त्याने जेष्ठाचा खून

संतोषला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे तो फुरसुंगीत दशक्रिया घाटावर दारू पिण्यासाठी बसत होता. त्यावेळी नरसिंग गव्हाणे हे सुद्धा दारू आणि गांजा पिण्यासाठी तेथे बसत होते. घाटावर संतोष आल्याचे पटत नसल्यामुळे नरसिंग त्याला शिवीगाळ करीत होते. त्याचा राग आल्यामुळे 29 डिसेंबर 2019 ला रात्री बाराच्या सुमारास नरसिंग गांजा ओढत असताना संतोषने त्यांना विटेने आणि दगडाने मारहाण करून खून केला.