रांगेची कटकट नाही, ना उन्हाची चिंता; ज्येष्ठ, दिव्यांगांचे कारमध्येच लसीकरण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रांगेची कटकट नाही की उन्हाची चिंता… कारमधून यायचं, कारमध्येच लस घ्यायची आणि निघून जायचं! पालिकेच्या माध्यमातून दादरच्या कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशातील हे पहिलेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ ठरले आहे. आजपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात 227 वाहनांमधून आलेल्या एकूण 417 ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले.

देशभरात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव वाढताना पालिकेच्या माध्यमातून वेगाने लसीकरण मोहीम राबाविण्यात येत आहे. पालिकेच्या सुमारे 40 आणि खासगी 72 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत लसींच्या तुटवडय़ामुळे मोजक्या केंद्रांवर लसीकरण सुरू असले तरी पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचे लसीकरण सुखकर होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लांबच लांब रांगांमध्ये नागरिकांना पाणी-सावलीची  व्यवस्था, काही ठिकाणी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र ज्येष्ठ, दिव्यांगांना रांगेत तासन्तास ताटकळत राहणे गैरसोयीचे ठरत असल्याने त्यांच्यासाठी कारमधून आल्यावर कारमध्येच लसीकरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ दादर पश्चिमच्या कोहिनूर पार्किंग स्क्वेअर लॉटमध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार सदा सरवणकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत,  नगरसेविका प्रीता पाटणकर, प्रकाश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ उपक्रमात पहिल्याच दिवशी 350 हून जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले.

दिवसाला चार हजार जणांचे लसीकरण

  • दादरच्या कोहिनूर लसीकरण केंद्रात ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ मोहिमेत दररोज 250 पेशा जास्त ज्येष्ठ, दिव्यांगांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जाणार आहे. या उपक्रमात 45 वर्षांवरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच ही व्यवस्था असेल.
  • ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रावर दोन सत्रांमध्ये मिळून एकूण 8 डॉक्टर्स, 70 वॉर्डबॉय, 18 परिचारिका नेमण्यात आले आहेत.
  • कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये या उपक्रमात 7 बूथच्या माध्यमातून लसीकरण केले जाईल. त्यामुळे ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’व्यतिरिक्त या ठिकाणी दररोज चार हजार जणांचे लसीकरण करण्यासाठी काम केले जाणार आहे.
  • दोन बूथ ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी येणाऱया 500 जणांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार असल्याची माहिती जी/उत्तरचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.