
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून अशा परिस्थिती नागरिकांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांनी माणुसकी दाखवत विद्यार्थी, पालकांना दिलासा द्यायला हवा. लॉकडाऊन काळात भरपूर कमावलंत. ऑनलाईन वर्ग घेणाऱया शाळांनी आता फीमध्ये कपात करायला हरकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने खासगी शाळांना झोडपले आहे.
सध्या देशातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद असून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने पालकांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. शाळा बंद असल्याने सध्या शिक्षण संस्थांना भौतिक सोईसुविधांवरील खर्च करावा लागत नाही. त्यामुळे शाळांनी फीकपात करायला हवी, असे मत न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे.
राजस्थान सरकारने खासगी शाळांना 30 टक्के फी कपात करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी काही संस्थाचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने शाळांना वापरात नसलेल्या सोयीसुविधांसाठी पालकांकडून फी आकारून नफेखोरी करणे टाळा असे सूचित केले.
व्यावसायिकरण थांबवा
वापरात नसलेल्या सोयीसुविधांसाठी फी आकारून नफेखोरी आणि व्यावसायिकरण शाळांनी थांबवावे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शाळा बंदच होत्या. त्यामुळे निश्चितपणे पाणी, वीज, मेंन्टेनन्स, वीज, साफसफाईवरील शाळांच्या खर्चाची बचत झाली आहे, हे निरीक्षण नोंदवत कायद्यानुसार विद्यार्थ्यांना न पुरविल्या गेलेल्या सोईसुविधांसाठी फी आकारू नये, असे सर्वोच् च न्यायालयाने स्पष्ट केले.




























































