आधी आयपीएल मग वर्ल्ड कप, सप्टेंबरमध्ये यूएईत होऊ शकते उर्वरित लीग स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व ग्राऊंडमन यांना कोरोनाची लागण झाल्याने चार आठवडय़ांनंतर ‘बीसीसीआय’ला ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेचा गाशा गुंडाळावा लागला. याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले. मात्र टी-20 वर्ल्ड कपसह उर्वरित आयपीएलही यूएईमध्ये आयोजित करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने तयारी सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शक्य

आयपीएलच्या उर्वरित 31 लढती सप्टेंबरच्या आधी घेणे ‘बीसीसीआय’ला आता शक्य होणार नाही, असे दिसते. कारण आता ‘टीम इंडिया’ला इंग्लंडच्या दौऱयावर जायचे आहे. इंग्लंड दौऱयावरील कसोटी मालिका 14 सप्टेंबरला संपल्यानंतर उर्वरित आयपीएल होऊ शकते, असे ‘बीसीसीआय’ला वाटतेय. कारण इंग्लंड दौऱयावर हिंदुस्थानचा संघ बायो-बबलमध्ये असेल. त्यामुळे इंग्लंड दौऱयानंतर यूएईमधील नव्या बायो-बबलमध्ये सहभागी होताना फारशा अडचणी येणार नाहीत. त्यामुळे 25 सप्टेंबरच्या आसपास ते ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत उर्वरित आयपीएलचे सामने घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

म्हणून सोयीस्कर

हिंदुस्थानात होणारा टी-20 वर्ल्ड कप यूएईमध्ये स्तलांतरीत होणार की नाही याबाबत काही दिवसांत घोषणा होऊ शकते. यूएईमध्ये वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत शिक्कामोर्तब झाल्यास 16 देशांतील संघ या स्पर्धेसाठी येणार आहेत. या स्पर्धेपूर्वीच आयपीएलमधील परदेशी क्रिकेटपटूंना यूएईमध्ये बोलावण्याची ‘बीसीसीआय’ची योजना आहे. आधी उर्वरित आयपीएल घ्यायची. आयपीएल संपल्यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या देशांच्या संघात सहभागी होतील. जे खेळाडू वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसतील ते आपापल्या देशात परततील, असे ‘बीसीसीआय’ला नियोजन करायचे आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या आधी आयपीएल होणार की नाही, याबाबत काही दिवसांत स्पष्टता होणार आहे.