
महानंद डेअरीचे दूध आजपासून दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात ग्राहकांना दिलासा देण्याबरोबरच आपली घसरलेली विक्री वाढवण्यासाठी प्रति लिटर दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची कपात केली आहे.
राज्यात मागील वर्षी दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अमूल, महानंदसह सर्वच डेअरींनी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करत 48 रुपये केला होता. त्यानंतर राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने महानंदच्या दुधाचे एकूण वितरण दीड लाखापर्यंत खाली आले आहे. ती वाढवण्याबरोबरच आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर दुधाचा दर 48 रुपयांवरून 46 रुपये केल्याचे महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी सांगितले.
वितरकाने 25 टक्के विक्री वाढविल्यास कमिशन वाढणार
महानंदने दुधाचा दर कमी करतानाच विक्री वाढावी म्हणून वितरकांसाठीही खास योजना आणली आहे. त्यानुसार सध्या विक्री केल्या जात असलेल्या दुधामध्ये 25 टक्क्यांची वाढ केल्यास त्यांना सध्या दिल्या जात असलेल्या प्रति लिटरच्या कमिशनमध्ये 85 पैशांची वाढ केली जाणार आहे.


























































