कोणाला मिळणार टीम इंडियाचे तिकीट? जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान – न्यूझीलंड यांच्यामध्ये या वर्षी 18 जूनपासून इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी पुढच्या आठवडय़ात टीम इंडियाची निवड होण्याची शक्यता आहे. सीनियर राष्ट्रीय निवड समितीकडून 35 संभाव्य क्रिकेटपटूंच्या नावांची यादी बीसीसीआयला सोपवण्यात आली आहे. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांमध्ये 22 क्रिकेटपटूंची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे या दौऱयावर 15ऐवजी 22 क्रिकेटपटूंना संधी देण्यात येणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडण्यात येणारा हिंदुस्थानी संघ जवळपास निश्चित आहे. पण या लढतीसाठी कोणत्या युवा खेळाडूला संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

बहुतांशी खेळाडू निश्चित

हिंदुस्थानच्या कसोटी संघातील बहुतांशी क्रिकेटपटूंचे स्थान निश्चित आहे. याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडला मायदेशात धूळ चारली होती. या दौऱयांमधील बहुतांशी खेळाडू जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये असू शकतील. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन या खेळाडूंचे टीम इंडियातील स्थान पक्के आहे. तसेच मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल या खेळाडूंनाही संधी देण्यात येऊ शकते.