
चंद्रपूरमध्ये एका हत्तीच्या हल्ल्यात सरकारी अधिकार्याचा मृत्यू झाला आहे. प्रमोद गौरकर असे अधिकार्याचे नाव असून ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मुख्य लेखापाल म्हणून कार्यरत होते.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमधील गजराज हा हत्ती गुरूवारी दुपारपासून आक्रमक झाला होता आणि कॅम्पमधून पळून आजूबाजूला फिरत होता. याच दरम्यान वनाधिकारी कुळकर्णी आणि प्रमोद गौरकर या भागात गस्त घालत होते. आक्रमक झालेल्या गजराजने त्यांच्या गाडीवर हल्ला केला; ज्यामध्ये गौरकर यांचा मृत्यू झाला.
वनविभागाची टीम आणि पशुचिकित्सक बोटेझरीकडे रवाना झाले असून गजराज या हत्तीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे याच गजराज हत्तीने यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीच्या शोधमोहीमेत मोठा गोंधळ घातला होता, तर 16 नोव्हेंबर 2019 ला याच गजराजने जानकीराम मसराम (45) या माहुताचा मोहर्ली येथील हत्ती कॅम्पमध्ये हल्ला करून जीव घेतला होता. त्यामुळेच मोहर्लीचा हत्ती कॅम्प बोटेझरी येथे स्थानांतरीत करण्यात आला होता.




























































