
दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 17 मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या 19 एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र हा लॉकडाऊन आज 10 मे रोजी संपणार आहे, परंतु दिल्लीतील कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊनचा परिणाम चांगला दिसून येत असून 26 एप्रिलनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचा दर 30 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर आल्याचे केजरीवाल म्हणाले.
























































