
कोरोनाबाधित 93 वर्षीय बाबूराव सुतार या आजोबांना घरी घेऊन जा, उपचारांचा काही उपयोग होणार नाही असे सांगून डॉक्टरांनी बाबूराव सुतार यांना घरी पाठवले. मात्र सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील मल्हार पेठचे रहिवासी असणारे बाबूराव सुतार यांनी घरीच सुरू असलेल्या उपचारांना साथ देत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवत एक नवा आदर्श कोरोनाग्रस्तांपुढे ठेवला आहे.
कोयना कृषक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि शासनाच्या ‘सहकार महर्षा’ पुरस्काराने सन्मानित केलेले बाबूराव कृष्णाजी सुतार ऊर्फ अण्णा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. छातीत खूप इन्फेशन होते. रुग्णालयामध्ये नेले असता आपण यांना घरी घेऊन जा. घरीच चार-पाच दिवस सेवा करा. या वयात उपचारांचा काही उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. अण्णांना त्यांच्या कुटुंबीयांनी घरी परत आणले आणि धीर न सोडता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले. आजोबांनीही या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. कोणत्याही वयात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कसल्याही संकटावर मात करता येते हेच 93 वर्षीय आजोबांनी कोरोनातून बरे होत दाखवून दिले आहे.
घरच्या घरीच उपचार
आजोबांना घरी आणल्यावर श्वास घेताना अडचण होत होती. ताप येऊन घसा दुखत होता. ऑनलाइन पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केला. ऑक्सिजन लेव्हलही कमी होती म्हणून घरातच ऑक्सिजन मशीन लावले. सर्व उपचार पद्धती केल्यावर एनर्जी सायन्सचे काही विशेष उपाय केले. घरातील वातावरण फ्रेश होण्यासाठी उपाय केले. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबातील सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
हा नव्या युगातील नवा रोग असून एकदम उद्भवतो. त्याचे स्वरूप दिसत नाही. मी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वाचलो, अशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली.























































