
जाहिरात फलक लावण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख 60 हजार रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून येरवडा वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवराज धोंडोंप्पा चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांना जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला होता. त्या अर्जानुसार ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बसवराज चित्ते याने तक्ररादार यांच्याकडे 3 लाख 60 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने तक्रारीची पडताळणी केली होती. त्यावेळी चित्ते याने लाचेची मागणी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.






























































