
एन्कांऊटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या गोंदिया येथे झालेल्या बदलीला मॅट कोर्टाने आज अंतरिम स्थगिती दिली. तसेच ते सध्या कार्यरत आहेत तेथेच त्यांना कोर्टाचे पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश दिल्याने दया नायक आता एटीएसमध्येच कायम राहणार आहेत.
6 मे रोजी पोलीस महासंचालक कार्यालयातून दया नायक यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यांची गोंदियाच्या जिल्हा जात पडताळणी विभागात बदली दाखवण्यात आली होती. त्याविरोधात नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली. नायक यांचा एटीएसमधील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. त्यांना दहशतवादी टोळ्यांकडून धोका आहे. गेल्या सात वर्षांत त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. प्रत्येक वेळी त्यांना ए प्लस एसीआर मिळाला आहे. या बाबींचा विचार करून नायक यांच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांचे वकील मकरंद लोणकर यांनी केली होती.
अतिउत्कृष्ट कामगिरी
दया नायक यांच्या गोपनिय अहवालात ए प्लस असा शेरा आहे. म्हणजे त्यांची पोलीस खात्यात अतिउत्कृष्ट कामगिरी झाली आहे. अंडरवर्ल्डचे पंबरडे मोडण्यात, अतिरेक्यांच्या नांग्या ठेचण्यात, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यात दया नायक यांचा सिंहाचा वाटा असल्यानेच त्यांच्या एसीआयमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांनी ‘आऊट स्टॅडिंग कामगिरी’ असा शेरा लिहिला आहे. अशा या धडाकेबाज अधिकाऱयाची मुंबई बाहेर त्याच्या जीवाला धोका असताना बदली झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.




























































