
पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल 14 हजार कोटींच्या घोटाळय़ातील आरोपी, कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदीला विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी त्याला 11 जून रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. तसेच आर्थिक गुन्हेगार कायद्याखाली तुमची मालमत्ता जप्त का करू नये, अशी विचारणा करीत ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली आहे.
काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर त्याला हिंदुस्थानात आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून न्यायालयांनी कायद्याचा फास आवळला आहे. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा आणि आर्थिक अफरातफरीच्या गुह्यातील आरोपी आहे. विशेष न्यायालयाने त्याला डिसेंबर 2019 मध्ये वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित केले होते.





























































