
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव मिळवले. ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल-3’, ‘हाऊसफुल-2’ यांसारख्या सिनेमांत श्रेयसने काम केले. मात्र त्यानंतर श्रेयसचे सिनेमा फारसे आले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तो मोठय़ा पडद्यापासून दूर गेला आहे. एका मुलाखतीत श्रेयसने त्याच्या करियरमधील चढउताराबद्दल बोलताना ‘मित्रांनी पाठीत खंजीर खुपसला’ असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
‘इकबाल’ सिनेमा वगळला तर अन्य कोणत्याही सिनेमात श्रेयस आपली सोलो हिरो म्हणून छाप सोडू शकलेला नाही. याबद्दल मुलाखतीत विचारले असता श्रेयस म्हणाला, ‘‘जर माझा कोणताही सोलो सिनेमा हिट ठरू शकला नाही. याचा अर्थ असा होत नाही की माझे इतर सिनेमा हिट ठरू शकत नाहीत. माझे काही सिनेमा आहेत ज्यात मी मुख्य भूमिकेत आहे आणि ते सिनेमा चांगले गाजले. माझ्याकडे स्वत:चे मार्पेटिंग करण्याची क्षमता नाही, हे कदाचित यामागचे कारण असू शकते. माझे असे मत आहे की, आपल्याला फक्त आपल्या कामाच्या जोरावर पुढील प्रोजेक्ट मिळायला हवेत.’’
श्रेयस पुढे म्हणाला, ‘‘परिचयातील काही जणांना माझ्यासोबत स्क्रीन शेअर करणे सुरक्षित वाटत नाही. मी अनेक सिनेमा केवळ मैत्रीपूर्ण नात्याच्या भावनेने पूर्ण केले आहेत. पण त्यांनीच माझा भरवसा तोडला आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला. काही हरकत नाही. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारलादेखील वाईट काळाला सामोरे जावे लागले होते. मी जेंव्हा निराश होतो तेंव्हा विचार करतो की, मी ‘इकबाल’सारखा सिनेमा केलेला आहे.

























































