लढाई कठीण आहे, जिंकण्यासाठी सज्ज रहा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘फॅमिली डॉक्टरां’ना साद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत फॅमिली डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जगभरात प्रत्येक घराचा एक स्वतःचा कुटुंबाचा डॉक्टर असतो. रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या याच कुटुंबाच्या डॉक्टरांवर ठेवतात. तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी सरकारसोबत या लढाईत उतरावे.

होम क्वॉरंटाइन कोरोना रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य ‘माझा डॉक्टर’ म्हणून आपण उचला. लढाई मोठी भयानक आणि जीवघेणी असली तरी ती जिंकण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील 17 हजार 500 फॅमिली डॉक्टरांना केले. या सर्व डॉक्टरांना एकाच वेळी टास्क फोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारी ही देशातील पहिलीच वैद्यकीय परिषद ठरली आहे.

‘प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनावर उपचार’ या विषयावर वनएमडी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने ही परिषद आयोजित केली होती. राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फॅमिली डॉक्टरांना कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

रुग्णांमधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे 

कोरोनामुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यात मधुमेह असलेला रुग्ण असल्यास आणखी स्थिती बिकट होते. त्यामुळे रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असल्याकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘माझा डॉक्टरां’चे लक्ष वेधले.

पावसाळी आजार रोखणे गरजेचे 

आता पावसाळा उंबरठय़ावर असल्याचे सांगून पावसाळ्यात उद्भवणाऱया सर्दी, ताप, खोकला, पडसे यासारख्या आजारांबरोबर  मलेरिया, डेंग्यु, लेप्टोसारख्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱया सर्व डॉक्टरांची जबाबदारी फार मोठी असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्सचेही मार्गदर्शन 

उपचार पद्धतीत नेमकेपणा आवश्यक असतो, त्यासाठी दिशा दाखवण्याचे काम राज्य टास्क फोर्सचे सदस्य करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱया लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स आपण स्थापन केला आहे. आजच्या प्रमाणे येत्या काही दिवसांत राज्यभरातील बालरोग तज्ञांना या टास्क फोर्सचे तज्ञ मार्गदर्शन करतील, आपण हा कार्यक्रम आयोजित करू.

डॉक्टरांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणार 

राज्यातील सर्व डॉक्टर जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता सैनिकांप्रमाणे रुग्णांचा जीव वाचवण्याचे काम करतात. डॉक्टरांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न याची आपल्याला जाणीव असून शासन तुमच्यासोबत आहे. तुमच्या अडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी डॉक्टरांना दिला.

टास्क फोर्स डॉक्टर्सचे मार्गदर्शन 

कोरोना उपचारात सहा मिनिटांचा वॉक, पेशंटची ऑक्सिजनची स्थिती, त्याची गरज, बुरशीमुळे होणाऱया म्युकर मायकोसिस आजारावरील उपचार, रेमडिसिवीरचा वापर, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची घ्यावयाची काळजी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, पोस्ट कोविड रुग्णांची घ्यावयाची काळजी, सिटी स्कॅनचा वापर, स्टिरॉईडचा वापर, त्याच्या वापराचे परिणाम, दुष्परिणाम, ऑक्सिजनचा सुयोग्य वापर अशा विविध विषयांवर डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर  आदी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

डॉक्टर्स, मान्यवरांनी केला अभिनंदनाचा वर्षाव 

या आगळ्यावेगळ्या परिषदेच्या आयोजनासाठी अनेक डॉक्टर्सनी  आणि मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिले. सुमारे 3 हजारावर प्रतिक्रिया व सूचना यावेळी प्राप्त झाल्या. तर हजारएक लोकांनी हा कार्यक्रम शेअर केला. अशा स्वरूपाचे कार्यक्रम कोविड काळात कायम आयोजित करावेत. जेणेकरून मार्गदर्शन मिळत राहील, असेही अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

होम क्वॉरंटाइन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची लक्ष्मणरेषा ओळखा! 

आजही 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जात नाही. ते घरीच विलगीकरणात राहातात, उपचार घेतात, काहींना तर औषधांचीही गरज पडत नाहा,r पण काही रुग्ण हे काही कालावधीनंतर गंभीर होतात. रुग्णालयात उशिरा आल्याचं डॉक्टर सांगतात. रुग्ण घरच्या घरी आजार अंगावर काढतात. होम क्वॉरंटाइन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची ही ‘लक्ष्मणरेषा’ तुम्हाला ओळखायची आहे. घरी  उपचार घेणाऱया रुग्णाची प्रकृती, त्याला असलेल्या सहव्याधी, त्याची ऑक्सिजनची पातळी तपासणे, त्याचप्रमाणे या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचाराचे मार्गदर्शन करणे, त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज असेल तर त्यांच्या गरजेनुसार योग्य दवाखान्यात वेळेत दाखल करणे, त्यांच्यावर उपचार सुरू करणे या सर्व गोष्टींकडे त्या रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने गृहविलगीकरणातील रुग्णांचे उत्तम व्यवस्थापन झाल्यास आपण मृत्युदरही कमी करू शकू असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

देव तुमच्या रूपात दिसतो 

राज्यातील लसीकरणाची स्थिती, लसींची उपलब्धता याबाबतची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे आज बंद आहेत. मग आपल्याला देव कुठे दिसतो, तर तो तुमच्या रूपात दिसतो. तुम्हा देवदूतांच्या मदतीने आपण कोविडविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

जवळच्या रुग्णालयात सेवा द्या! 

‘माझा डॉक्टरां’नी त्यांना शक्य असेल तिथे त्यांच्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी. त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच, परंतु आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.