इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडविरुद्धच्या दौऱयासाठी हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची निवड झाली. या दौऱयावर हिंदुस्थानी महिला एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. कसोटी आणि वन डे संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राज करणार असून, टी-20 संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

17 वर्षीय धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माला प्रथमच वन डे आणि कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर 27 वर्षीय स्नेहा राणा हिचे पाच वर्षांनंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन झाले आहे.

हिंदुस्थानी महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टाँटन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 3 जुलै रोजी वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर 9 ते 15 जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे.

व्हर्च्युअल मीटिंगमधून संघाची निवड

संघनिवड समिती, प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासह ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल मीटिंगमधून हिंदुस्थानच्या महिला संघाची निवड करण्यात आली. संघनिवडीच्या एक दिवस आधीच रमेश पोवार यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली होती. मागच्या वेळी मिताली राज हिच्याशी वाद झाल्याने त्यांना प्रशिक्षकपद सोडावे लागले होते.

झारखंडची इंद्राणी रॉय नवा चेहरा

झारखंडची यष्टिरक्षक फलंदाज इंद्राणी रॉय हिची प्रथम हिंदुस्थानी संघात वर्णी लागली आहे. इंद्राणीने मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या स्थानिक वन डे स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी केली होती. तिने 76 च्या सरासरीने आणि 86.52च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 456 धावा फटकाविल्या होत्या. यंदाच्या सत्रात चारशेहून अधिक धावा करणारी इंद्राणी ही एकमेव क्रिकेटपटू ठरली होती.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टिरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव.

टी-20 मालिकेसाठी संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टिरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, सिमरन दिल बहादूर.