
श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण शिर्डीच्या साईबाबा संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जपली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना हा प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी आली आहे, असे कौतुकोद्गार काढतानाच सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून राज्याची दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार प्राधान्य देत असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी संचालित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसऱया लाटेची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्यसेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसऱया लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सिजन मोठय़ा प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदींसह रिलायन्स फौंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
असा आहे ऑक्सिजन प्रकल्प
प्रास्ताविकात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी या प्रकल्पाकिरता रिलायन्स फांऊडेशनतर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले असल्याची माहिती दिली. संस्थानच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅण्टची क्षमता 1200 लिटर प्रती मिनीट असून त्याद्वारे साईनाथ रुग्णालयातील 300 बेडकरिता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरणपूरक असून तो 24 तास कार्यरत राहणार असून त्याकरिता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही.
संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार
श्री साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत. साईबाबा संस्थानने हाच सेवेचा वारसा पुढे चालविल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. याशिवाय, आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.






























































