
सध्या कोरोनामुळे आजूबाजूला उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपण हसणंच विसरून गेलो आहोत. अशा परिस्थितीत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावरून सगळ्यांना खूश राहण्याचा अनोखा मंत्र सांगितला आहे. तेजस्विनीने आपले हसतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय, ‘‘माझ्याकडे काय ती परफेक्ट स्माईल वगैरे नाही. तसे दातही नाहीत. मी हिरड्या दाखवून हसते. मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजूनमापून करायचं? त्यातून हसणं… छे!! आहे अशी आहे! पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या!” पुढे तिने म्हटलंय, ‘‘दात दाखवून असो वा खळखळून. मला हसायला आवडतं. हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात. हल्ली हसायला फार कमी मिळतंय. तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी सोडू नका. क्या पता कल हो ना हो!” तिची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.






























































