परवानाधारक रिक्षाचालकांना 22 मेपासून मदतीसाठी अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केल्यानंतर दुर्बल घटक तसेच हातावर पोट असणाऱयांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज जाहीर केले. त्यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय 19 एप्रिल रोजी घेण्यात आला. यासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ही मदत रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत. केवळ ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, परवाना क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. 22 मेपासून हे अर्ज करता येणार आहे.

रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्याबाबत 19 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. याबाबत कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. 22 मेपासून रिक्षाचालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण 21 मे रोजी करण्यात येणार आहे. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.