
नगर तालुक्यातील हनिट्रप प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत (दि. 22) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या घटनेचा तपास सध्या सुरू असून, आरोपींच्या ताब्यातून हस्तगत केलेल्या मोबाईलचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यातून अनेकांची नावे उजेडात येण्याची शक्यता आहे.
नगर तालुक्यामध्ये जखणगाव येथे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील आरोपी संबंधित महिला व अमोल मोरे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्यांच्या आवाजाचे नमुनेही घेण्यात आले आहेत. या घटनेत अजून कुणाकुणाचा समावेश आहे, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल त्यांनी कसा मिळविला, याचा शोध घ्यावयाचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारपक्षाकडून करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या हनिट्रप प्रकरणात दुसरा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱयाला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. वरील आरोपींनीच ही खंडणी मागितली होती. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.
पोलीस तपासामध्ये संबंधित आरोपी मोरे हा संबंधित महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱया व्यक्तीचा व्हिडीओ शूटिंग करीत होता. त्यानंतर तो व संबंधित महिला त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे मागत असल्याचा प्रकार घडला. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आरोपींकडून मोबाईल हस्तगत केले आहेत. याचा तपास सध्या सुरू आहे. ज्या व्यक्तीकडून या आरोपींनी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्याने 80 हजार रुपये संबंधित महिलेला दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ते पैसे कुठे व कसे दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये अमोल मोरे, महेश बागुल यांचा समावेश आहे. मोरे याला अटक केली असून, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
– राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी.






























































