कराडमध्ये बोगस महिला डॉक्टरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱया बोगस महिला डॉक्टरला कराड पोलिसांनी आज रंगेहाथ पकडले आहे. या बोगस महिला डॉक्टरला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी दिली आहे. सुवर्णा मोहिते (रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे अटक केलेल्या बोगस महिला डॉक्टरचे नाव आहे.

सुवर्णा मोहिते ही कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे ‘पंत क्लिनिक’ नावाने एक दवाखाना चालवत होती. कालेगण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे, तसेच कोरोना मृत्यूदरही वाढत आहे. यापैकी अनेक रुग्णांनी पंत क्लिनिक येथे उपचार घेतल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यादव यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सदर क्लिनिकला भेट दिली. मात्र, अनेकदा हे क्लिनिक बंद असल्याने यादव यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

बुधवारी दुपारी पंत क्लिनिक येथे सुवर्णा मोहिते ही रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सापळा रचून पोलिसांनी पंत क्लिनिकवर छापा मारला असता ती बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.