पंतप्रधान मोदींच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील हिवरेबाजार गावाच्या कोरोनामुक्तीच्या पॅटर्नचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. यावेळी हिवरेबाजारसह संपूर्ण महाराष्ट्रच कसा कोरोनावर नियंत्रण मिळवतोय हे सांगताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळेच कोरोनाशी लढय़ाला यश येत असल्याचे पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यांतील 60 जिल्हाधिकाऱयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. बैठकीला या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांकडून कोरोनाविषयीची माहिती घेतली. महाराष्ट्रातील हिवरेबाजार गाव कसा कोरोनामुक्त झाला हे ऐकण्यात  पंतप्रधानांना विशेष रस होता. नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गावकऱयांच्या बनविण्यात आलेल्या टीम, त्यांनी घेतलेली जबाबदारी याची माहिती तर दिलीच, शिवाय संपूर्ण नगर जिह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यांना यश आले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचना यामुळेच हे शक्य झाले, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेल्या व्यापक मोहिमेची माहितीही पंतप्रधानांना दिली.

राज्य सरकारने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मोठय़ा प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून केलेले प्रयत्न, खासगी डॉक्टरांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन या गोष्टींचा
डॉ. भोसले यांनी आवर्जून उल्लेख केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भोसले यांचे कौतुक

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक कामाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन त्यावर समाधान व्यक्त केले. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी भोसले यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले व ते करत असलेले कौतुकास्पद काम यापुढेही सुरू ठेवावे, असे आवाहन केले.

 केंद्रीय आरोग्य सचिवांची मुंबईला शाबासकी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच रुग्णांवरील उपचार, ऑक्सिजन पुरवठय़ाचे व्यवस्थापन याबद्दल आरोग्य सचिवांकडून आज पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.

  बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील कोविडची स्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम ऑक्सिजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ऑक्सिजनचा बफर स्टॉक करताना अधिकाऱयांचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱया लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सिजन मास्क तयार ठेवावेत, अशी सूचना केली.