
कारची चावी विसरण्याची अनेकांना सवय असते. प्रवासादरम्यान कुठेही आपण कारची चावी विसरलो की मोठा त्रास सहन करावा लागतो. या कटकटीपासून आता लवकरच सुटका होणार आहे. गुगल सध्या डिजिटल कार की फीचरवर काम करत आहे. यामुळे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनने कार लॉक, अनलॉक आणि स्टार्ट करू शकता.
डिजिटल चावीचे हे फीचर आयफोन युजरसाठी गेल्या वर्षभरापासून उपलब्ध आहे. अनेक आयफोन युजर या फीचरचा वापर करत आहेत. आता गुगलदेखील या फीचरवर काम करत असल्याचे कंपनीने नुकतेच वार्षिक संमेलनात सांगितले आहे. मित्र किंवा नातेवाईकांना कार हवी असेल तर त्यांनाही आपण डिजिटल चावी शेअर करू शकतो. सध्या हे फीचर 2021मधील निवडक मॉडेलसाठी आणि 2022मध्ये येणाऱया कारसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
हे फीचर यूडब्ल्यूबी तंत्रज्ञानावर काम करते. हे एक प्रकारचे रेडिओ ट्रान्समिशन तंत्र आहे ज्यात सेन्सर रडार म्हणून काम करतो अन् सिग्नलची दिशा सांगतो. ज्यांच्या कारमध्ये एनएफसी तंत्रज्ञानाची सोय आहे त्यांनाच या फीचरचा फायदा होईल.































































