
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. या परिस्थितीत लोककलावंतांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र असं असलं तरी लोककलावंतांनी जनजागृतीचा वसा सोडलेला नाही. ते डिजिटल माध्यमाचा वापर करून जनप्रबोधनाचे काम करत आहेत. लोककलेचं ‘व्हर्च्युअल’ स्वरूप बघायला मिळत आहे.
सध्याच्या काळात प्रत्यक्ष लोककला सादर करणे शक्य नसल्याने लोककलावंत व्हिडियोंच्या माध्यमातून जनप्रबोधन करताना दिसत आहेत. लोककलावंतांसाठी हे माध्यम नवीन आहे. मात्र तरीही काळाची गरज ओळखून कलावंतांनी डिजिटल मंचावर, लोककलेच्या पारंपरिकतेला धक्का न लावता ‘एंट्री’ घेतली आहे. आपापल्या घरातून, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ते व्हिडियो तयार करत आहेत. प्रा. गणेश चंदनशिवे, प्रा. योगेश चिकटगावकर, डॉ. आझाद नायकवडी, शेखर भाकरे आदी लोककलावंतांचे व्हिडियो व्हायरल होत आहेत.
50 कलावंतांनी साकारले लोकगीत
लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती व्हावी, यासाठी डोंबिवली येथे राहणारे लोककलावंत प्रा. योगेश योगेश चिकटगावकर यांनी लोकगीत तयार केले आहे. ‘घ्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून’ असा संदेश देणारा हा व्हिडियो सध्या मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. यात विविध जिल्ह्यांतील 50 कलावंतांनी कुठेही एकत्र न येता आपापल्या गावांतूनच हे लोकगीत साकारले आहे. या गीताचे रेकॉर्डिंग आणि शूटिंग मोबाईलमध्ये करण्यात आलेय. चिकटगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या वेळी क्वारंटाईन असताना त्यांना या गीताची संकल्पना सुचली आणि त्यांनी हे गीत लिहिले. अलिकडेच यू-टय़ूबवर लाँच झालेल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लसीकरण करून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका, हा संदेश आम्ही गाण्याच्या माध्यमातून दिला आहे. स्वतःच्या पदरमोड करुन मी व्हिडीओ तयार केला आहे. लोककलावंत लॉकडाऊनच्या काळात नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत. त्या कलावंतांना हे गीत नवीन काम करण्याची प्रेरणा देणार आहे. म्हणजे घरात राहून आपण व्यावसायिकरीत्या किंवा प्रबोधनात्मक कसं काम करू शकतो, ही प्रेरणा या गीतातून मिळते.
– प्रा. योगेश चिकटगावकर
शाहीर नायकवडी यांचा पोवाडा गाजतोय
कोल्हापूर येथील शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांचा कोरोना जगजागृतीपर पोवाडा नुकताच डिजिटल मंचावर लाँच झाला आहे. त्यांचा पोवाडा कोल्हापूर जिल्ह्यात गावोगावी दाखवला जाणार आहे. त्यात कोरोना काळात नागरिकांनी घ्यावयाची काळजी कवनाच्या रूपाने मांडण्यात आली आहे. डॉ. आझाद नायकवडी यांनी गेली 25 वर्षे लोककलेचा वसा जपला आहे. गेल्या वर्षी शाहिरी पोवाडय़ांवर पीएचडी मिळवली आहे.
याविषयी डॉ. नायकवडी म्हणाले, जियो, सावन म्युझिक अशा 165 प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी पोवाडा लाँच झाला. जेव्हा जेव्हा देशात समस्या, संकटं आली त्या त्या वेळी मी प्रबोधनात्मक पोवाडे केले आहेत. कोल्हापूरला कोरोनाचे रुग्ण वाढले. मला काय होतंय, मी धडधाकट आहे असे म्हणत लोक घराबाहेर पडू लागले तेव्हा त्यांच्यात जागृती करण्याच्या हेतूने मी ‘डिजिटल’ पोवाडा साकारला. रुग्णालयात जायचे नसेल तर मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर या नियमांचे पालन करा. सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आपले घर. हेच सांगण्याचा प्रयत्न पोवाडय़ातून केलाय.






























































